शेतीची शाळा १

एक जुनंच खूळ पुन्हा नव्याने डोक्यात घेतलंय. आपलं एक शेत असावं असं दिवास्वप्न मी कित्येक वेळा पाहिलंय, आणि आपल्या गेल्या काही पिढ्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही, शेती करणारे परवडत नाही म्हणून सोडताहेत आणि दुसरा पर्याय असताना शेती करणं म्हणजे भिकेचे डोहाळे इ. इ. सगळं ऐकून समजून शेती शक्य नाही म्हणून हा विचार झटकून टाकायचा प्रयत्नही केलाय. पण तीन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण, माऊच्या सखीची आई याच खुळाने अशीच झपाटलेली असतांना, एकेकटीने हे शक्य नाही, पण आपण मिळून काही करू शकतो, मज्जा येईल करायला!” असं दोघींच्या लक्षात आलं, आणि आम्ही आपल्याला रोज जाऊन कसता येईल अशी जमीन हवी म्हणून शोधायला लागलो. घरापासून एक – दीड तासाच्या अंतरातली जमीन घ्यायची, आणि आपण स्वतः कसायची अशी साधारण डोक्यात कल्पना घेऊन शेतं बघत हिंडायला सुरुवात झाली. अजून एक मैत्रीण पण आमच्यात सामील झाली.

घरापासून एक – दीड तासात गाडीने पोहोचता यायला हवं, शेतापर्यंत रस्ता हवा – कुणाच्या बांधावरून जाणं आणि त्याचे वाद परवडणारे नाहीत, पाणी आणि वीज ऍक्सेसिबल पाहिजे हे सगळे निकष लावल्यावर मिळणारी जमीन परवडणारी नाही, परवडणारी यात बसणारी नाही असं मग लक्षात आलं. अजून जरा खोलात शिरल्यावर सात बारा – फेरफार उतारा – वहिवाटीचे हक्क या सगळ्या गुंत्यामध्ये पडतांना जसजसे अनुभवी लोकांशी बोलायला लागलो, तसं तसं लक्षात आलं, की जमीन घेणं, त्याची किंमत चुकती करणं आणि उद्यापासून कसायला सुरुवात इतकं सुरळीत प्रकरण हे नाही. यात भरपूर फसवणूक आहे, अडवणूक आहे, सरकार दरबारी करून घेण्याची कामं आहेत. आणि कुठलीही अडवणूक – फसवणूक न होता जमीन मिळाली – ज्याची जाणकार म्हणतात की १% सुद्धा शक्यता नाही – तरी जमिनीत केलेली गुंतवणूक शेतीच्या उत्पन्नातून वसूल होण्याची शक्यता पुढच्या काही पिढ्यांमध्ये तरी नाही.

यातून कसा मार्ग निघणार यावर विचार करत होतो. एव्हाना आम्ही शेती करणार ही बातमी लोकांपर्यंत पोहोचायला लागली, आणि आम्हाला पण शेती करायची आहे म्हणत अजून तीन मैत्रिणी सामील झाल्या. जमिनीचा पत्ता नाही, शेती कसायचा अनुभव नाही, तरीही. झेडबीएनएफचं शिबिर कर, ज्ञानेश्वर बोडकेंचे यूट्यूब व्हिडिओ बघ, प्रिया भिडेंकडे गच्चीतली मातीविरहित सेंद्रीय बाग बघायला जा असं चाचपणी करणं चाललं होतं. मग सगळ्या मिळून ज्ञानेश्वर बोडके सरांच्या एक एकरवरच्या एकात्मिक शेतीच्या कार्यशाळेला जाऊन आलो. पहिल्यांदाच कुणीतरी शेती फायद्यात कशी करायची याविषयी अनुभवातून बोलत होतं, त्यामुळे मला हे आवडलं.

हळुहळू मग लक्षात आलं, शेतजमीन विकत घेणं हा आपला उद्देश नाहीच. आपल्याला शेती करायची आहे. मग जमीन विकत घेण्याच्या मागे कशाला लागायचं? शेती शिकणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आणि जसजसं लोकांशी बोलत गेलो, तसतसं हेही लक्षात आलं, की आपली शेती हवी म्हणून उत्साहाने जमीन घेणारे आणि ती कसायला वेळ न मिळणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी आपल्यासाठी उदंड जमीन विकत घेऊन ठेवलेली आहे! ;) तर शेती शिकायची, आणि मग मोठ्या मुदतीच्या भाडेकराराने आपल्याला सोयीची जमीन वापरायला घ्यायची.

एक मैत्रिण आमच्या शेती करायच्या इच्छेविषयी विज्ञान आश्रमाच्या योगेश सरांशी बोलली. त्यांनी त्यांच्या Do it yourself Lab मध्ये शेती शिकायला या, इथे जमीन आहे, अवजारं आहेत, मार्गदर्शन मिळेल असं सुचवलं. विज्ञान आश्रमाच्या incubator मध्ये शेती शिकायची म्हणजे सोप्पंच झालं एकदम काम. साधारण वर्षभर इथे शिकू या, तोवर आपण कोणकोण, काय आणि कसं करू शकतो याचा अंदाज येईल आणि मग मोठ्या प्रमाणावर हे सगळं करता येईल अशी आशा आहे. त्यामुळे एप्रिल पासून आमची शेतीची शाळा चालली आहे. त्याच्या गमतीजमती इथे जमेल तश्या(?!) टाकायचा विचार आहे.

Comments

Popular posts from this blog

नांगरणीशिवाय शेती – प्रताप चिपळूणकर

शेतीची शाळा २