नांगरणीशिवाय शेती – प्रताप चिपळूणकर

प्रताप चिपळूणकर हे गेली ४० वर्षे शेती करत आहेत. शेतीविषयातले ते पदवीधर आहेत, आणि त्यांचा सूक्ष्मजीवशास्त्राचाही अभ्यास आहे. प्रामुख्याने ऊस आणि भात ही पिके ते घेतात. त्यांचा अभ्यास आणि शेतीतले अनुभव या दोन्हीच्या आधारे नांगरणीशिवाय शेती पद्धतीविषयी त्यांनी या पुस्तकात माहिती दिलेली आहे. पुस्तकातील लेख आधी ऍग्रोवनमध्ये लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध झालेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी द्विरुक्ती दिसते, पण संवर्धित शेतीविषयी बरीच माहिती या पुस्तकामधून मिळते. हे पुस्तक आणि प्रताप चिपळूणकरांचं एक व्याख्यान या दोन्हीमधून मिळालेली / मला समजलेली माहिती इथे एकत्र दिली आहे.

* (Resource conservation technology) संवर्धित शेतीचा भर प्रामुख्याने गरजेपुरती नांगरणी किंवा नांगरणीशिवाय शेती यावर असतो. माणसाच्या किंवा शेतीच्या इतिहासामध्ये नांगराचा शोध, पशूंकडून नांगरणी, लाकडाऐवजी लोखंडी नांगराचा वापर हे प्रगतीचे टप्पे मानले गेलेले आहेत. पूर्वमशागत जितकी चांगली, जितकी खोल नांगरट तितकं उत्तम पीक हा विचार इतक्या काळापासून रुजलेला आहे. नांगरणी कमी करणे हा विचार विसाव्या शतकात प्रथम पुढे आला. रासायनिक खतांचा वापर, यंत्रांच्या वापरामुळे जमीन कठीण बनणे आणि जमिनीची धूप ही यामागची मुख्य कारणे होती. १९६० मध्ये शून्य मशागतीवर पेरणीचे यंत्र विकसित होणे आणि तणनाशकांचा उपयोग करून तण नियंत्रण हे दोन शोध लागल्यानंतर व्यापारी तत्त्वावर शून्य मशागतीचे प्रयोग प्रत्यक्ष शेतांमध्ये सुरू झाले. भारतामध्ये हे तंत्र खर्‍या अर्थाने वापरात आले ते १९९६ नंतर. खरीप भाताची काढणी झाल्यावर जमीन नांगरून मग गहू पेरणी होईपर्यंत खूप वेळ जाऊन गव्हाला थंडीचा काळ कमी मिळाल्याने उत्पन्न घटत होते, त्यामुळे पेरणीपूर्वी मशागत न करता, भाताचे काड तसेच ठेवून पेरणी करणारी यंत्रे विकसित केली गेली. पुढे या यंत्रांमध्ये अनेक सुधारणा झाल्या. हे तंत्र वापरतांना त्याचे अनेक फायदे लक्षात आले. फक्त भातानंतर गव्हाचे पीक लवकर घेता यावे म्हणूनच ही पद्धत वापरावी असे नाही, तिचे इतरही अनेक फायदे आहेत.

* शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावर अनेक मर्यादा पडतात. बाहेरून उचलून हे खत शेतात आणून टाकणे जिकिरीचे आणि महाग पडते. त्याऐवजी आधीच्या पिकाचे काड, मुळांचा भाग असे बरेचसे अवशेष शेतातच ठेवून ते शेततच कुजू दिले, तर त्यापासून कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चात उत्तम खत जागेवरच मिळते. त्यातही चिपळूणकर यांचा अनुभव असा, की उसाचे निव्वळ पाचट कुजवले तर जे खत मिळते, त्यापेक्षा खोडकी आणि मुळे (तोडणीनंतर जमिनीत राहणारा भाग) कुजवल्यावर मिळालेले खत अधिक चांगल्या दर्जाचे असते.
त्यांनी झाडाच्या कुजणार्‍या भागांचे ३ गटात वर्गीकरण केले आहे. पाने, कोवळे देठ असे सेल्युलोजपासून बनलेले भाग हे कुजण्यास हलके, हेमीसेल्युलोजपासून बनलेला देठाचा भाग हा मध्यम कुजणारा, तर लिग्निनपासून बनलेला बुंधा आणि मुळे हा कुजण्यास जड भाग. वनस्पतीचा घटक कुजण्यास जितका जास्त जड, तेवढा तो जमिनीच्या सुपीकतेसाठी फायदेशीर असतो. वेगळ्या भाषेत चिपळूणकर असं सांगतात, की झाडाचा जो भाग जाळून जास्त ऊर्जा मिळते, तोच भाग कुजून जमिनीला जास्त सुपीकता मिळते. कुजायला जड पदार्थ बुरशी कुजवते. कुजायला हलके पदार्थ जीवाणू कुजवतात. लवकर कुजवणारे, मध्यम कुजवणारे, जड कुजवणारे अशा सर्व प्रकारच्या जीवांना जमेनीत खाद्य मिळाले तर जमिनीत जैविक सुपीकता येते. सहज कुजवणारे सूक्ष्मजीव जी कणरचना निर्माण करतात, ती पाण्यात अस्थिर असते, पाण्यामुळे ती कणरचना सहज बदलते आणि योग्य निचरा होत नाही. याउलट जड पदार्थ कुजवणारे सूक्ष्मजीव जी कणरचना निर्माण करतात, ती पाण्यात स्थिर राहते.

* जमिनीखाली कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, तेंव्हा सेंद्रीय पदार्थ कुजवणारे जीवाणू कुजणार्‍या पदार्थातील अन्नद्रव्यांबरोबरच त्या परिसरात उपलब्ध असणारी सर्व अन्नद्रव्ये स्वतःच्या वाढीसाठी वापरतात, आणि यामुळे तिथे वाढणार्‍या झाडांच्या मुळांना जीवाणूंशी स्पर्धा करावी लागते, पीकाची उपासमार होते. सेंद्रीय पदार्थ पूर्ण कुजल्यावर मगच पीकाला पुरेशी अन्नद्रव्ये मिळू शकतात. रोटाव्हेटरने नांगरणी केली, तर सेंद्रीय पदार्थाचे बारीक तुकडे होऊन मातीत मिसळतात, कुजण्याची प्रक्रिया भरभर होते, आणि कुजवणार्‍या  जीवाणूंची वेगाने वाढ झाल्याने पीकाच्या उपासमारीचा धोका वाढतो. त्यामुळे जमिनीखालची मुळे शक्यतो जमिनीखालीच सावकाश कुजू द्यावीत. पिकाचे तुकडे वरच्यावर करून त्याचे आच्छादन करावे. मुळांना धक्का न लावल्यास ती कुजण्याचा वेग अतिशय मंद राहतो आणि पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत राहतात.

* जमिनीने पिकांच्या मुळ्यांना वाढण्यास योग्य वाव दिला पाहिजे, त्यांना पाणी आणि अन्नद्रव्ये गरजेप्रमाणे उपलब्ध झाली पाहिजेत, सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती, वायुवीजनासाठी योग्य तितक्या पोकळ्या, जैविक नत्र स्थिरीकरण, अन्नद्रव्ये साठवणे, गरजेप्रमाणे पिकांना उपलब्ध करणे अशा अनेक घटकांच्या एकत्रीकरणातून जमिनीची सुपीकता साकार होते.

* जमीन जिवंत असते. तिच्यात अनेक लहान मोठे सजीव वाढत असतात, ते जमिनीला जिवंतपणा देतात. जमिनीतील अजैविक घटक उत्तम स्थितीत असतील तर सजिवांचे आरोग्य चांगले टिकून राहते आणि जमिनीला शाश्वत सुपीकता प्राप्त होते.

* सुपीक जमिनीचे लक्षण म्हणजे ती कायम जिवंत हिरव्या आच्छादनाने झाकलेली असली पाहिजे, आणि त्यामुळे सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणात सतत वाढ होत राहिली पाहिजे. पिकांची वाढ रासायनिक पेक्षा जैविक सहभागातून झाली पाहिजे. पीक फेरपालटातून रोग – कीड नियंत्रण झाले पाहिजे. कमीत कमी हालवाहालवी झाली पाहिजे. अवजड यंत्रसामुग्री वापरल्याने मोडली जाणारी नैसर्गिक सच्छिद्रता व येणारा टणकपणा यापासून जमीन वाचली पाहिजे. मशागतीमुळे सेंद्रीय कर्बाचे कर्ब वायूत जास्त वेगाने रूपांतर होऊन त्याचा र्‍हास गरजेपेक्षा जास्त वेगाने होतो. (का?) सजिवांच्या चक्रातून जमिनीची योग्य कणरचना तयार झाली पाहिजे.

* जर जमिनीच्या वर वाढणारा पिकाचा भाग योग्यरित्या वाढत नसेल, तर जमिनीच्या आतील सजीवांची वाढही योग्य प्रमाणात होत नसते. उत्तम जैविक व्यवस्थापनात जमिनीत लहानमोठ्या पोकळ्या सतत तयार होत राहिल्या पाहिजेत.पोकळ्यांतून मुळांच्या आणि सूक्ष्मजीवांच्या श्वासोच्छ्वासासाठी आणि सेंद्रीय कर्बाचे कर्ब वायूमध्ये रूपांतर करण्यासाठी प्राणवायू उपलब्ध होतो. जैविक प्रक्रिया चालू राहणे म्हणजे जमीन सजीव असणे होय.
संवर्धित शेतीमध्ये झाडे वाढवणे, पिकाच्या उर्वरित भागाचे आच्छादन, आच्छादन वनस्पती वाढवणे (जिवंत), हिरवळीच्या पिकांची लागवड, पिकांचा फेरपालट, कडधान्यवर्गीय पिकांचा आंतर्भाव यातून सेंद्रीय कर्बाचे व्यवस्थापन केले जाते. मुळांच्या सभोवतालच्या परिसरातील एकपेशीय प्राणी व निमॅटोडही योग्य व्यवस्थापनात जैविक नत्र स्थिरीकरण करतात.

* जितक्या प्रमाणात एखाद्या पीकवाढीसाठी अन्नद्रव्ये वापरली जातात, तितक्या प्रमाणात ती परत जमिनीत आली पाहिजेत.मुख्यत्वेकरून ती पिकांच्या अवशेषातून आच्छादनरूपात यावीत.

* अन्नद्रव्यांची जैवप्रक्रीय हलचाल संवर्धित शेतीत प्रचलित शेतीच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते, यामुळे प्रचलित पद्धतीतील माती परीक्षणातून खतांच्या शिफारशींचे नियम संवर्धित शेतीला लागू पडणार नाहीत. फॉस्फरस, अमोनियम स्वरूपातील नत्र, तांबे व जस्त या अन्यथा मंद हालचाल करणार्‍या अन्नघटकांची योग्य प्रमाणात हालचाल मायकोरायझा बुरशीमुळे शक्य होते.

* उत्तम दर्जाच्या खतासाठी द्विदलवर्गीय वनस्पतीपेक्षा एकदल चांगल्या. एकदल काडामध्ये कर्बाच्या तुलनेत नत्राची टक्केवारी कमी असल्याने असे काड सावकाश कुजते. तसेच द्विदल तणांच्या सोटमुळांपेक्षा एकदल वनस्पतींची तंतूमय मुळे कुजल्यावर जमिनीच्या सुपीकतेमध्ये फार मोठी सुधारणा करू शकतात.

* नांगरणी न करता पेरणी केल्यावर तणनाशकाचे योग्य साहाय्य न घेतल्यास तणनियंत्रण करणे जोखिमीचे होऊ शकते. तण हाताबाहेर गेल्यास पिकाचे १००% नुकसान होऊ शकते. यासाठी योग्य तणनाशकाचा वापर हा संवर्धित शेतीमध्ये महत्त्वाचा ठरतो.

* जमिनीत २ प्रकारचे सूक्ष्मजीव असतात –
१.    कुजवणारे – जमीन सुपीक बनवतात
२.    खतातली अन्नद्रव्ये झाडाला उपलब्ध करून देणारे – झाडाला पोषण देतात.
तयार शेणखत किंवा कम्पोस्ट वापरल्यामुळे जमिनीतले दुसर्‍या प्रकारचे सूक्ष्मजीवच पोसले जातात, पहिल्या प्रकारचे नाही.

* जमिनी अल्कधर्मीय होणे – जमिनीचा ph वाढणे ही सध्या एक मोठी समस्या आहे. रासायनिक खतांचा वापर, अती पाणी देणे ही कारणे आहेत असा समज आहे. परंतु सर्व रासायनिक खते ही आम्लधर्मीय असतात. त्यांच्या अति वापराने जमिनीचा ph कसा वाढेल? कुजण्याच्या क्रियेतून ph कमी होतो (humic acid) तर पिकाच्या वाढीमध्ये तो वाढतो. त्यामुळे कुजणे आणि पिके घेणे या दोन्ही क्रिया एकाच जमिनीमध्ये झाल्या तर जमिनीचा ph टिकून राहतो.

* रासायनिक खते झाडाला थेट वापरता येत नाहीत. याचे ३ टप्पे असतात:
१.    रासायनिक खत टाकणे.
२.    त्याचा अंश जमिनीत नीट साठवला जाणे. खत पाण्यात विरघळून वाहून न जाता जमिनीत टिकून राहायला हवे, स्थिरीकरण व्हायला हवे. यासाठे जमिनीत पुरेसा सेंद्रीय कर्ब आवश्यक असतो.
३.    झाडांच्या गरजेप्रमाणे सूक्ष्मजीव ही अन्नद्रव्ये झाडाला उपलब्ध करून देतात.

* झाडे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात हे आपण शाळेत शिकलो, वस्तुस्थिती वेगळी असते. वनस्पती प्राण्यांचे अन्न निर्माण करतात. प्राण्यांच्या पोटातल्या सूक्ष्मजीवांमुळे या अन्नाचे प्राणी पचन करू शकतात. प्राणी मेल्यावर सूक्ष्मजीव त्यांच्यामधली अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात.

“Soil is the part of Earth crust where biology and geology meet!”

Comments

Popular posts from this blog

शेतीची शाळा २

शेतीची शाळा १